मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार होणार आहे. सचिन वाझेचा माफीच्या साक्षीदाराबाबतचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने स्वीकारला आहे. आता सचिन वाझेला 7 जूनला कोर्टासमोर हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले ( court allows sachin vaze plea to turn prosecution witness ) आहेत.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी 26 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये माफीचा साक्षीदार होण्याकरीता अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सीबीआयकडून देखील मंजुरी देण्यात आली होती. आज ( 1 जून ) या अर्जाला विशेष सीबीआय कोर्टाने देखील मंजुरी दिली असल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेला आज सीबीआयच्या विशेष कोर्टापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. त्यामध्ये सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे. 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी सचिन वाझेने विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला. सीबीआयने त्याच्या अर्जाला सशर्त मंजुरी दिली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आपल्याकडे असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेंनी दाखवली आहे.
शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप लावल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्यात यावा याकरिता वकील जयश्री पाटील यांनी तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने तपास सुरू केला. आतापर्यंत या प्रकरणात सीबीआयने 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्य आरोपी असून, या प्रकरणात सहा आरोपी निलंबित एपीआय सचिन वाझे, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे, वकील आनंद डाग यांना अटक करण्यात आले होते.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं , सा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.