मुंबई - कोरोना संक्रमणाचे वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य शासनाकडून नवीन कडक निर्बंध सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून लागू करण्यात आलेले आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेतील गोष्टींना परवानगी देण्यात आलेली असून यात मेडिकल, फळ-भाज्या व किराणा मालाच्या दुकानांसह बेकरीसारखी दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बोरिवलीच्या व्यापाऱ्यांनी नोंदवला निषेध
सोमवारी रात्री 8 वाजता लागू करण्यात आलेल्या नवीन निर्बंधांची दखल मंगळवारी सकाळी मुंबईतील व्यापाऱ्यांनी घेतली नसल्याचे निदर्शनास आले होते. सकाळी मुंबईतील बहुतांश ठिकाणी व्यावसायिक दुकानही चालू करण्यात आली होती. मात्र काही वेळातच स्थानिक पोलिसांकडून या व्यापाऱ्यांना कोरोनाच्या संक्रमणाचे नवीन निर्बंध लागू करण्यात आले असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकान सोडता इतर दुकाने बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. या वेळेस काही वेळासाठी व्यापारी व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी या व्यापाऱ्यांना समजावून त्यांना त्यांची दुकाने बंद करण्यास सांगितले होती. बोरिवली पूर्व येथील स्टेशनजवळ असलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली होती, मात्र दुकानांसमोर रांगा लावून त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन कोरोना संक्रमणामध्ये दुकान बंद ठेवू नये, अशी मागणी केलेली होती.