मुंबई - मुंबईसह देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात असला तरी काही देशांमध्ये आलेल्या ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटमुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक 'बूस्टर डोस' देण्याचे निर्देश दिल्यास तशाप्रकारचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. मुंबईत १८ वर्षांवरील ९२ लाख ३६ हजार लाभार्थी आहेत. पालिकेनेही २०० केंद्रांवर 'बूस्टर डोस' देण्याची व्यवस्था केली असून त्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले आहे.
'केंद्राने निर्देश दिल्यास पालिका सज्ज' : मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर कोरोना झपाट्याने पसरला. त्यानंतर सुमारे वर्षभराने १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वांना डोस देण्यात येत आहेत. या लसीकरणात आतापर्यंत ११८ टक्के नागरिकांना पहिला डोस पूर्ण झाला असून ९९ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. तर ६० वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वकर्सना पहिली लस घेऊन ९० दिवस झाले असल्यास 'बूस्टर डोस' देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख ८४ हजार ७९४ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. दरम्यान, 'बूस्टर' डोस देण्याचे निर्देश केंद्राने दिल्यास पालिका त्वरीत आवश्यक कार्यवाही करून लसीकरणाला सुरुवात करेल. यासाठी आवश्यक लसीकरण केंद्रे वाढवण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
आतापर्यंत दिले २ कोटी डोस : १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत २ कोटी ४ लाख ५० हजार ९३८ डोस देण्यात आले आहेत. यामध्ये १२ ते १८ वर्षे वयोगटासाठी १५ हजार २३९ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९९ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे.
हेही वाचा - Attack on Shopkeeper in Thane : ठाण्यात दुकानदारावर जीवघेणा हल्ला; स्थानिकांकडून एका हल्लेखोराला बेदम मारहाण