मुंबई - मागील वर्षभरापासून रखडलेल्या कुर्ला येथील पिकनिक हॉटेलजवळील कृष्णलाल मारवाह पुलाची ( Mumbai Krushna lal Marvaha ) पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने ( Mumbai Muncipal Corporation ) घेतला आहे. या निर्णयामुळे साकी विहार व अंधेरी-मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे जाण्यासाठी कमी वेळेत पोहचता येणार आहे. किमान चार ते पाच किमीचा वळसा यामुळे टळणार आहे.
दोन कोटी पाच लाख रुपये खर्च - पिकनिक हॉटेल, कुर्ला येथे सात मीटर रुंदीचा असलेल्या मारवाह पुलाची जून २०२१मध्ये दक्षिणेकडील भिंत कोसळल्यामुळे पुलाला तडे गेले. त्यानंतर हा पूल तातडीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा पूल साकी विहार रस्ता व मरोळ मरोशी रोडवरील पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला जाण्याकरता मुख्य मार्ग आहे. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे सेव्हन हिल्सला जाण्याकरिता अंधेरी-कुर्ला-घाटकोपरमार्गे चार ते पाच किमी वळसा मारून जावे लागते आहे. अंधेरी-कुर्ला-घाटकोपर मार्गावर कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सेव्हन हिल्स रुग्णालय व या परिसरात पोहोचण्यासाठी किमान एक ते दीड तासापेक्षा जास्त वेळ जात आहे. तब्बल नऊ महिने हा पूल बंद असल्याने प्रवासी व नागरिकांचे अक्षरश: हाल होत आहेत. पुलाचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून या पूलासाठी सुमारे दोन कोटी पाच लाख रुपये खर्च येणार आहे.
आणखी वर्षभर पाच किमीचा फेरा - पुलाच्या पुनर्बांधणीसाठी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी वर्षभर सेव्हन हिल्स रुग्णालय व साकी विहार रोडला जाणाऱ्या नागरिकांना चार ते पाच किमी वळसा मारून जावे लागणार आहे.
हेही वाचा - House For MLA : 'आमदारांच्या घरासाठी कुठलाही प्रस्ताव किंवा कोणत्याही आमदाराची मागणी नाही'