मुंबई - गोरेगाव पश्चिम परिसरातील 'सिद्धार्थ महापालिका सर्वसाधारण रुग्णालय' असे नाव असताना या रुग्णालयाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देता येणार नाही, असे स्पष्ट करत प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव फेटाळला आहे. भाजपाने नामकरणासाठी आरोग्य समितीत या संबंधित प्रस्ताव मांडला होता.
भाजपाची मागणी
गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयाचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी रुग्णालय असे नामकरण करण्याची मागणी या परिसरातील भाजपाचे नगरसेवक हर्ष पटेल यांनी केली होती. तसे पत्र पटेल त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये गोरेगाव पी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष यांच्यामार्फत आरोग्य समिती अध्यक्षांना पाठवले होते. त्यानुसार हे पत्र आरोग्य समितीच्या पटलावर ठेवण्यात आले होते. नामकरणाबाबतच अभिप्राय घेण्यासाठी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी हे पत्र पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात आले. यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने अभिप्राय दिला आहे. सध्या या रुग्णालयाचा पुनर्विकास सुरू आहे.
प्रशासनाने मागणी फेटाळली
सन १९९८ मध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयाचे सिद्धार्थ सर्वसाधारण रुग्णालय असे नामकरण करण्यात आले आहे. हा परिसर सिद्धार्थनगर नावाने ओळखला जातो. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर भगवान गौतम बुद्ध यांचा अर्धपुतळाही होता. याची महापालिकेने आठवण करून दिली आहे. त्यामुळे प्रचलित नाव विशिष्ट कारणाशिवाय बदलता येणार नसल्याचे स्पष्ट करत भाजपाची ही मागणी फेटाळून लावली आहे.
हेही वाचा - PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण