मुंबई - मागील आठ महिन्यांपासुन मुंबईत कोरोनाचा कहर सुरू आहे. पण मागील महिन्याभरापासून मुंबईतील रुग्णांची संख्या कमी होत चालली असूनही दिलासादायक बाब आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे कोरोना कमी झाला म्हणत नागरिक मात्र कमालीचे बेफिकीर झाले आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत नागरिक वागत आहेत. त्यात आता दिवाळीत लोकं मोठ्या संख्येने एकत्र येण्याची शक्यता असून प्रदूषणही वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती मुंबई महानगर पालिकेकडूनही व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मुंबईत 520 कोव्हिड हॉस्पिटल-सेंटर सज्ज असून त्यात 70 हजार बेडसची सुविधा उपलब्ध आहेत. तर नर्स-डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी असे पुरेसे मनुष्यबळही तयार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.
28 बेडस ते 70 हजार बेडस-
चीनमधील कोरोना व्हायरस मार्चमध्ये मुंबईत आला आणि या व्हायरसने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत हाहाकार माजवला. 1000 पासून 2800 पर्यंत रुग्ण आढळत होते. पण आता मात्र कोरोनाचा हाहाकार थोडा कमी झाला आहे. आता दिवसाला 700 ते 1000 रुग्ण आढळत आहेत. दरम्यान मार्चमध्ये कोरोना येणार असे म्हणताच कोरोनाशी सामना करण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे.
मुंबईतील एकमेव संसर्गजन्य रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 28 बेड्स तयार करण्यात आले. पण मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या वाढू लागली. एप्रिलमध्ये रुग्णांचा आकडा खूपच वाढला. त्यामुळे मुंबईतील महत्वाचे सर्व पालिका रुग्णालय म्हणजेच सायन, केईएम, नायर असे सर्व रुग्णालय कोव्हिड म्हणून रुग्णालयात रुपांतरीत करण्यात आली. ही रुग्णालयेही कमी पडू लागल्याने रिकाम्या इमारती, शाळा, मैदाने, समाज मंदिर इथे अलिगिकरण कक्ष तयार करण्यात आले. या पुढे जात कोव्हिड सेंटर, जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले. मोठ्या संख्येने बेडस वाढले. आजच्या घडीला 18 हजार बेड कार्यान्वित आहेत. तर संपूर्ण मुंबईत 70 हजार बेड्स सज्ज आहेत. दुसरी लाट आली तर हे बेडस त्वरित उपलब्ध होतील, अशा अवस्थेत ठेवण्यात येणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे.
एकही कोव्हिड सेंटर बंद करणार नाही-
आजच्या घडीला मुंबईत 520 कोव्हिड सेंटर-रुग्णालय सज्ज आहेत. कोरोनाचे रुग्ण गेल्या महिन्याभरात खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे हजारो बेडस रिकामे पडले आहेत. काही कोव्हिड सेंटरमध्ये शुकशुकाट आहे. पण असे असले तरी आम्ही एकही कोव्हिड सेंटर बंद करणार नाही. फक्त सेवा बंद असेल. पण गरज लागल्या बरोबर सेवा सुरू करता येईल, अशी आमची तयारी असेल, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.
महत्वाचे म्हणजे कोव्हिडसाठी नव्याने जे काही मनुष्यबळ तयार करण्यात आले आहे ते मनुष्यबळ ही आहे तसेच ठेवण्यात येणार आहे. एकही कर्मचारी, डॉक्टर, नर्स कमी केले जाणार नाही. जेणेकरून दुर्दैवाने दुसरी लाट आलीच तर रुग्णसेवा देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असेल, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.