मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून हा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लवकरच लस येणार असून त्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्सची पहिली बैठक आज होणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आज बैठक
कोरोनाच्या लसीबाबत मुंबई महापालिकेने तयार केलेल्या टास्क फोर्सची आज पहिली बैठक होत आहे. ही बैठक मुंबई महापालिका मुख्यालयात होणार आहे. या बैठकीमध्ये मुंबईतल्या महापालिका रुग्णालयांचे डीन, केंद्रीय पथकाचे दोन अधिकारी आणि मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त असणार आहेत. मुंबईमध्ये पहिल्या टप्प्याचे लसीकरण कसे करता येईल याचे नियोजन या बैठकीत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वालाख आरोग्य सेवकांना लसीकरण केले जाणार आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
किती रुग्ण?
मुंबईत मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला, तेव्हापासून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईमधील 10 डिसेंबर रोजी कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 88 हजार 689वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 948वर पोहचला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 64 हजार 971वर गेला आहे. 11 हजार 943 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 302, दिवस तर सरासरी दर 0.23 टक्के आहे.
लसींची चाचणी सुरू
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लस हाच प्रभावी उपाय आहे. महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. त्याचवेळी पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार आहे.
वैशिष्यपूर्ण रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेज रूम
कोरोनावर लस येण्याचे संकेत निर्माण झाले आहे. कोरोना लसीचा साठा कांजूर येथे पालिकेच्या इमारतीत करण्यात येणार आहे. तर लस उपलब्ध झाल्यानंतर पहिली लस केईएम रुग्णालयात देण्याबाबत विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. केईएम हॉस्पिटलमध्ये वैशिष्यपूर्ण रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेज रूम तयार करण्यात आला आहे. कोविड लसीसाठी आवश्यक असणाऱ्या नियंत्रित तापमानाची कोल्ड स्टोरेज रूम असणार आहे. प्रत्येक रेफ्रिजरेटरला तापमान नियंत्रक रिमोट आणि मॉनिटर असणार आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी पॉवर बॅकअप सिस्टम अॅक्टिव्ह असणार आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक व्यक्तींनाच कोल्ड स्टोरेज रूममध्ये प्रवेश दिला जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. तर गरजेनुसार लसीच्या साठवणूकीसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.