मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता मुंबई दौऱ्यावर आहेत. हा दौरा काही शासकीय कामासाठी आहे. मात्र, त्या मुंबईत आल्या तर आवर्जून ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकत नाही. मात्र, कॅबीनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि मी ममता बॅनर्जी यांचे मुंबईत स्वागत केले आहे. तसेच, यावेळी अनेक विषयांसह राजकीय विषयावरही चर्चा झाली अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
चांगली चर्चा केली राजकीय चर्चासुद्धा केली
भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते हे ईडी, सीबीआय, एनसीबी यांचा वापर करत दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असेच महान कार्य हे भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्येही करत आहेत. अशी टीका ममता दिदिंनी यावेळी केली आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थनाही केली. तसेच, 'जय मराठा जय बांगला' अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली आहे.
ममता बॅनर्जी शरद पवार भेट
ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत ज्या पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका वाघिणीसारखी झुंज दिली. आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं हे पाहता संपूर्ण देश आज ज्या प्रमुख नेत्यांकडे पाहतो आहे. त्याच्यामध्ये शरद पवारांसह ममता बॅनर्जी आहेत, उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे शरद पवार यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ममतादीदी जर पवारांना भेटत असतील तर ते नक्कीच स्वागतहार्य आहे असही राऊत म्हणाले आहेत.
हा ममतादीदी आणि काँग्रेसचा वाद आहे
पश्चिम बंगालमध्ये डावे देखील भुईसपाट झाले आहेत. काँग्रेसचा देखील अस्तित्व राहिलेलं नाही. भाजपचे बँड-बाजा पथक आलेलं होतं. त्याची हवा ममता दिदिंनी काढून घेतली आणि प्रचंड असा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. जे भाजपासोबत गेले त्यांच्यातही फाटाफूट झाली आणि ते पुन्हा ममतादीदीकडे वळले हा ममतादीदी आणि काँग्रेसचा वाद आहे. परंतु, एक समर्थ अशी आघाडी उभी करायची असेल तर सर्वांना एकत्र घेऊन जावं लागेल असही राऊत म्हणाले आहेत.