मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु याचा त्रास राज्यातील जनतेला व छोट्या व्यवसायिकांना देण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना मागच्या दाराने लॉकडाऊन लावून, आर्थिक डबघाईच्या खाईत ढकलण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे, असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. याविरोधात आज भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विकेंड लॉकडाऊन करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु तसं न करता 30 एप्रिलपर्यत सर्व दुकानं बंद करण्यात आली आहेत. असेही यावेळी भातखळकर यांनी म्हटले आहे.
यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले आहे. अमरावती जिल्ह्यात लावण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. जिल्ह्यामध्ये जेव्हा कोरोना संक्रमण वाढले होते, तेव्हा जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते, मात्र आता अमरावती जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.
हेही वाचा - नियम कठोर करा मात्र मंदिर बंद न करण्याची व्यापाऱ्यांची मागणी