मुंबई - राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून रणकंदन माजले असताना विरोधीपक्ष नेते व भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना बाधित झाले आहेत. अशातच राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपा यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध ( Rajya Sabha elections ) व्हावी यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले होते. परंतु आता ही निवडणूक होत असल्याने सहावी जागा निवडून आणण्यासाठी दोघांनाही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशातच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) कोरोना बाधित झाल्याने भाजपाचे ( BJP ) टेन्शन सध्या वाढले आहे.
भाजपाची चिंता वाढली? : १० जूनला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला तिसरा उमेदवार रिंगणात उतरला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही दुसरा उमेदवार दिल्याने ही लढत आता रंगतदार होणार आहे. यात काही शंका नाही. परंतु सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते प्राणपणाने प्रयत्न करताना दिसत असताना भाजपा आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. विशेष करून या निवडणुकीत महत्वाची भूमिका अपक्ष आमदारांवर अवलंबून असणार आहे. म्हणूनच भाजपाकडून या निवडणुकीची जबाबदारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच बघितले जात आहे. अशात त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने आत्ता जरी ते घरी बसून या निवडणुकीसंदर्भात रणनीती आखत असले तरीसुद्धा प्रत्यक्षात भेटून होणारा संपर्क हा होणार नसल्याने भाजपासाठी ही चिंतेची बाब आहे. मागील काळात मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करताना त्यांनी अपक्ष आमदारांसोबत त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांसोबत सुद्धा फार जवळचे संबंध प्रस्थापित केले आहेत. या निवडणुकीत देवेंद्र फडवणीस चमत्कार करू शकतात, अशी अपेक्षा भाजपालाच नाही तर महाविकास आघाडीमधील आमदारांना सुद्धा वाटू लागली आहे.
अशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड या त्रिमुर्तींवर जबाबदारी : देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर अनेक आमदारांची चिंता सुद्धा वाढली आहे. विशेष करून भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे स्वतः चिंतेत आहेत. कारण राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार जिंकवण्यासाठी राजकीय पक्षांची नजर ही लहान पक्ष आणि अपक्ष आमदार राहणार आहे. त्यासोबत आपल्या आमदारांची मते फुटू नयेत आणि दगाफटका होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. असे असले तरी देवेंद्र फडणवीस या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु त्यांना सध्या दौरे करता येत नसल्याने तसेच त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या तडजोडीचा किंवा त्या ताकदीचा नेता अपक्ष आमदार व लहान पक्ष यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपलब्ध नसल्याने भाजपासाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे. जरी या निवडणुकीसाठी भाजपा नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड या त्रिमूर्तीवर जबाबदारी सोपवली असली तरीसुद्धा सध्याच्या परिस्थितीत ते कितपत यशस्वी होऊ शकतात हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. भाजपाचे सध्याचे संख्याबळ १२२ इतके आहे. राज्यसभेचे दोन उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपाकडे २८ मध्ये राहतात. तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपाला १४ मतांची गरज आहे. आता या १४ मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी अशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांच्यावर प्रामुख्याने आहे.
इतर पक्ष व त्यांचे आमदार : बहुजन विकास आघाडी- हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील. समाजवादी पार्टी- अबू आझमी, शेख रईस. एमआयएम- फारूक अन्वर शाह, मुफ्ती मोहम्मद इस्माईल. प्रहार जनशक्ती पक्ष- बच्चू कडू, राजकुमार पटेल. मनसे- राजू पाटील. माकप- विनोद निकोले, शेकाप- श्यामसुंदर शिंदे. स्वाभिमानी पक्ष- देवेंद्र भुयार, राष्ट्रीय समाज पक्ष- रत्नाकर गुट्टे. जनसुराज्य शक्ती पक्ष- विनय कोरे.
'हे' आहेत १२ अपक्ष आमदार : प्रकाश आवडे, आशिष जयस्वाल, रवी राणा, नरेंद्र भोंडेकर, मंजुला गावित, चंद्रकांत पाटील, विनोद अग्रवाल, किशोर जोरगेवार, महेश बालदि, संजय मामा शिंदे, राजेंद्र राऊत, राजेंद्र यड्रावकर.
हेही वाचा - Rajya Sabha Voting : अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी, आघाडीचे टेन्शन वाढले