मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. यात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपा आणि मनसे या दोन पक्षांतील नेत्यांच्या अंतर्गत भेटी वाढल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (रविवारी) मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतिर्थ या नविन निवासस्थानी जावून भेट घेतली आहे.
मुंबई महानगरपालिकेमधील मराठी मतांचा टक्का 36 टक्के इतका आहे. या 36 टक्क्यांच्या मतांसाठी भाजपा आग्रही आहे. परंतु यापूर्वी भाजपाची युती ही शिवसेनेशी होती. परंतु आता युती तुटल्यानंतर भाजपाला स्वबळावर सगळी मतांची रणनीती करावी लागणार आहे. त्यातच मुंबईमधील मराठी माणसांची जुळलेला दुसरा पक्ष मनसेने देखील हिंदुत्वाची जोड धरलेली असल्यामुळे भाजपा आणि मनसे एकाच ट्रॅकवर आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी माणसांच्या मतांसाठी भाजपा-मनसेला घेऊन महापालिकेमध्ये युती करणार आहे का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मनसेची मदत घेणार का ?
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ही भेट राजकीय नव्हती, असे देखील त्यांनी माध्यमांना सांगितले. असे असले तरी पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा राज ठाकरे यांची मदत घेणार का? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.