पालघर - नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त 'अखंड भारत प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे', असे भाषणात म्हटले होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या या सूचना स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नालासोपाऱ्यात भाजप जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोच्या संख्यने भाजप कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
नालासोपाऱ्यात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीला भर पावसातही कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी प्लास्टिक मुक्त भारताचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवा यासाठी नालासोपारा एस.टी. डेपोपासून या रॅलीला सुरुवात केली. मुख्य म्हणजे ही रॅली नालासोपारा विधानसभा क्षेत्रातच काढण्यात आल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
रॅलीच्या निमित्ताने भाजपचे शक्ती प्रदर्शन ?
नालासोपारा विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. येथून प्रदीप शर्मांच्या उमेदवाराची चर्चा आहे, यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजपनेही स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली 'शक्तीप्रदर्शनाचा' नारळ फोडला आहे. बाईक रॅलीत कार्यकर्त्यांचा उत्साह हा भाजप नेत्यांचा प्रचार करण्यासारखा दिसला. तसेच कार्यकर्त्यांकडून नालासोपारा विधानसभेतून भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नालासोपाऱ्यातील भाजपचे नेते आणि जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांच्या सोबत बातचित केली असता, त्यांनी या मतदारसंघातून भाजपचा आमदार असावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता, त्यांनी सेनेबाबत कोणतेही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले.