मुंबई - मंत्रालयासमोर विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न पुण्यातील आंबेगाव येथील सुभाष जाधव यांनी केला आहे. त्यांना पोलिसांनी तातडीने मुंबईतील जीटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
सुभाष जाधव यांनी वैयक्तिक कारणातून मंत्रालयासमोर येऊन विष घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुभाष जाधव हे पुण्यातील आंबेगाव भागात राहतात. या भागात त्यांची असलेली जमीन आणि मालकीच्या घराचा वाद, या मुद्द्यावरून सुभाष जाधव यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर विष प्राशन केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नुकताच 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच मंत्रालयाबाहेर सुनील गुजर या शेतकऱ्याने अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. आर्थिक चणचण असल्याने सुनील गुजर यांनी हे पाऊल उचलले असल्याचे या घटनेनंतर समोर आले होते.
'सर्वसामान्य जनतेची महाविकास आघाडी सरकारकडून घोर निराशा'
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची महाविकास आघाडी सरकारने घोर निराशा केली आहे. या सरकारवर जनतेचा विश्वास उरलेला नाही. राज्य सरकारकडून जनतेला दिलासा मिळेल असे एकही काम झालेले नाही. त्यामुळे नैराश्यातून मंत्रालयासमोर नागरिक आत्महत्या करत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
हेही वाचा - Maha corona update : राज्यात ४ हजार ३६५ नवे रुग्ण, १०५ रुग्णांचा मृत्यू