मुंबई - दुचाकीवरुन जाणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने उपनिरीक्षक बचावले. ही घटना जेजे मार्ग जंक्शन परिसरात घडली.
वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश गवळी हे त्यांच्या कामानिमित्त मुंबईतील जे जे मार्ग जंक्शन येथून जात असताना अचानक त्यांचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला. यावेळेस या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात सदरचा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ राकेश गवळी यांना रुग्णालयात दाखल केले.
राकेश गवळी यांना व्हॉकार्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्यामुळे त्यांचा जीव बचावला. त्यांच्या गळ्याला दहा टाके पडले असून पुढील उपचार सुरू आहेत.
2017 मध्ये राष्ट्रीय हरित लवादाकडून सिंथेटिक किंवा नायलॉन मांजाच्या उत्पादन, साठवण व विक्रीवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. या अगोदरही मांजामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तींचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
हेही वाचा - 'टीआरपी'ची चौकशी नसती तर देशाचे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते'
हेही वाचा - मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत सोमवारनंतर बैठक घेऊन निर्णय घेऊ - महापौर