मुंबई : देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. शिवभक्त पहाटे उठून भगवान शंकराची पूजा करत असतात. अशाच एक कलाकार शिवभक्त लक्ष्मी गौड यांनी जुहू येथे भगवान शंकराचं वाळू शिल्प साकारून वंदन केले आहे.
2 दिवस 15 तासांची मेहनत
कलाकार लक्ष्मी गौड सांगतात की, 'हे वाळूशिल्प साकारण्यासाठी आम्हाला 2 दोन दिवस आणि पंधरा तास इतका वेळ लागला. हे चित्र काढण्यासाठी मला माझ्या मुलांनी देखील मदत केली. वाळू शिल्प काढताना आम्हाला भरती ओहोटीचा अंदाज घेणे, समुद्राची पातळी किती वाढते या सर्व बाबी लक्षात ठेवून वाळू शिल्प करण्यास सुरुवात करावी लागते. कारण, समुद्राची एक लाट सर्व मेहनतीवर पाणी टाकू शकते. त्यामुळे वाळू शिल्प काढताना आम्हाला खूप खबरदारी घ्यावी लागते.'
जुहू किनाऱ्यावर साकारले शिल्प
दरम्यान, कलाकार लक्ष्मी गौड मागील अनेक वर्षांपासून वाळू शिल्प साकारत आहेत. त्या मुंबईच्या जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळे शिल्प साकारत असतात. मागील वर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी बारा शिवलिंगांचे वाळू शिल्प साकारले होते. तर यावर्षी त्यांनी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील आदीयोग शंकराची भव्य प्रतिमा साकारली आहे.
हेही वाचा - महाशिवरात्री उत्सव : अमरावतीमधील प्राचीन कोंडेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी