मुंबई - सीएसएमटी येथील भानूशाली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमुळे मुंबईतील 16 हजार उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वास्तू विशारद चंद्रशेखर प्रभू यांनी इमारतीची मालकी रहिवाशांकडे देण्याची मागणी केली आहे. रहिवाशांकडे मालकी हक्क दिल्यास पुनर्विकास वेगाने आणि योग्य प्रकारे मार्गी लागेल, असे ते म्हणाले.
मुंबईत 16 हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. तर या इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे आहे. मात्र मालक असो वा दुरुस्ती मंडळ यांच्याकडून दुरुस्तीचे काम योग्य प्रकारे होत नाही. ही दुरुस्ती वेळेत आणि योग्य प्रकारे झाल्यास, अशा अनेक दुर्घटना रोखता येतील. मात्र, पुनर्विकास रखडला अशी ओरड वर्षानुवर्षे होत आहे. पण हा पुनर्विकास का रखडला आहे याचा विचार कोणीही करत नाही, असे चंद्रशेखर प्रभू म्हणाले.
पुनर्विकास रहिवाशांमुळे रखडल्याचीही ओरड असते. रहिवाशी पुनर्विकासाला तयार होत नाहीत, जीव मुठीत धरून अतिधोकादायक इमारतीत राहतात, असे म्हणत लोकांना दोष दिला जातो. पण त्यांच्यावर ही वेळ का येते, याचा विचार कोणीही करत नाही, असे म्हणत प्रभू यांनी सरकारच्या उदासिन धोरणाकडे बोट केले आहे.
इमारत पुनर्विकासासाठी गेल्यानंतर बिल्डर पुनर्विकास करत नाही. यासाठी अनेक वर्षे लावतात. त्यामुळे रहिवाशांना वर्षानुवर्षे हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागते. त्यात पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक होते. तर म्हाडाच्या संक्रमण शिबीरात गेलेले लोकं 25 ते 35 वर्षे संक्रमण शिबीरातच राहतात. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून रहिवासी जीव मुठीत धरून राहतात. पण घरं रिकामी करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या रखडलेल्या इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावायचा असल्यास इमारतीची मालकी रहिवाशांकडे देणे गरजेचे आहे. असे झाले तरच पुनर्विकास मार्गी लागेल, असे ही ते म्हणाले. रहिवासी मालक झाल्यास त्यांच्या मनाप्रमाणे पुनर्विकास होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.