मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ( Maharashtra Sadan Scam Case ) अंजली दमानिया यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव ( Anjali Damania runs High Court ) घेतली आहे. अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाला विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आहेत. सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती याला त्यांनी आव्हान दिली आहे.
याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता -
अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात समाजसेविका अंजली दमानिया यांनी आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने केली होती भुजबळांची निर्दोष मुक्तता -
महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी 9 सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती.
या प्रकरणात झाला होता दोन वर्षांची कारावास -
छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी भुजबळ यांना दोन वर्षांची जेलदेखील झाली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केले होते.
महाराष्ट्र सदन घोटाळा काय आहे ?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.
यापूर्वी दिला होता इशारा -
महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्र न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला होता. वाचा सविस्तर...
हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट
हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांची निर्दोष मुक्तता; अंजली दमानिया जाणार उच्च न्यायालयात