मुंबई - अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेले महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर झाले. राज्यात नवीन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खातेवाटप जाहीर होण्यासाठी वेळ लागत होता. या दरम्यान अनेक चर्चांना देखील उधाण आले होते.
तसेच पुढील आठवड्यात नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रिपदे देण्यासंबंधी जोर वाढत होता. अखेर हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या पहिल्या टप्प्यातील खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे.
यामध्ये शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना गृह खाते देण्यात आले आहे. त्याचसोबत नगरविकास, वने, पर्यावरण पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम संसदीय कार्य) आणि माजी सैनिक कल्याण या खात्यांचा पदभार शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, उच्च व तंत्र शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन आणि मराठी भाषा या खात्यांचा पदभार असणार आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थ व वित्त नियोजन, गृहनिर्माण तसेच सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार आणि अल्पसंख्याक विकास खाते देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे ग्राम विकास व जलसंपदा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार असणार आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची पुन्हा एकदा महसूल खात्यावर वर्णी लागली आहे. याचसोबत त्यांच्याकडे ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण तसेच शालेय शिक्षण, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय या खात्यांची जबाबदारी असणार आहे.
नितीन राऊत यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे.