मुंबई : गेल्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत एअर इंडियाच्या विमानांतून प्रवास केलेल्यांसाठी थोडी चिंताजनक बातमी आहे. एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्याची माहिती समोर आली असून सायबर चोरांनी यातून प्रवाशांशी संबंधित महत्वाचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे 45 लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील इतर एअरलाईन्सलाही याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रसिद्धीपत्रकातून एअर इंडियाची माहिती
एअर इंडियाने एका प्रसिद्धीपत्रकातून याची माहिती दिली आहे. जगभरातील सुमारे 45 लाख डेटा सब्जेक्टसला याचा फटका बसण्याची शक्यता एअर इंडियाने वर्तविली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदा डेटा प्रोसेसरकडून याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर फटका बसलेल्या डेटा सब्जेक्टसची माहिती डेटा प्रोसेसरने 25 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान आम्हाला दिली.
10 वर्षांतील डेटाची चोरी
26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 या कालावधीदरम्यानचा डेटा चोरीला गेल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. यात नाव, जन्मतारीख, संपर्काची माहिती, पासपोर्ट, तिकिट तसेच क्रेडीट कार्डची माहिती चोरीला गेली आहे. पासवर्डच्या माहितीचा यात समावेश नाही असेही एअर इंडियाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. सर्व्हर सुरक्षित करण्यात आला आहे. तसंच एयर इंडिया एफएफपी प्रोग्रामचे पासवर्ड सुद्धा रीसेट करण्यात आले आले आहेत.