मुंबई - आठवड्याहून अधिक काळ विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. मात्र, जुलै महिना संपत आला तरी अद्यापही राज्यात पावसाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही. दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जुलै अखेरीस पाऊस जोर धरू लागला आहे. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईत किंग सर्कल, माटुंगा आणि दादर, या परिसरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
आठवडाभराहून अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्य रात्रीपासून दमदार बॅटिंग केली. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात सकाळी पाणी साचले होते. त्याचा परिणाम मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला. शाळकरी मुलांना पावसातून आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली. तसेच ऑफिसला पोहोचणाऱ्या चाकरमान्यांनाही चांगलाच उशीर झाला. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नेहमी प्रमाणे त्याचा परिणाम मुंबईतील लोकल सेवेवरही झाला.
मुंबईसह कोकणात हळूहळू पाऊस जोर धरत आहे. मुंबईत मध्य रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नेहमीची ठिकाणे सोडता इतर न पाणी साचणाऱ्या ठिकाणीदेखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत व कोकणात अद्याप 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.