मुंबई : नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून ( Milk adulteration in Mumbai ) सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सहा जणांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे नियंत्रण पथकाने मुसक्या ( Milk Adulterers Arrested In Mumbai ) आवळल्या. पोलिसांच्या पथकांनी धारावीतील झोपडपट्टीमध्ये छापा टाकून तब्बल एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा ( Adulterated milk seized in Dharavi ) साठा हस्तगत केला. एका लिटरमध्ये पाणी मिसळून दुप्पट करून हे भेसळखोर दुधाची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
सहा जणांना ताब्यात - धारावीच्या शाहूनगर ( Shahoongar of Dharavi adulterated milk ) परिसरातील ए. के. गोपाळनगर या झोपडपट्टीमधील अनेक घरांमध्ये नामांकित कंपन्यांचे दूध ( Adulterated milk from reputed companies In Mumbai ) आणून त्यामध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती गुन्हे नियंत्रण पथकाला मिळाली. पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सहा वेगवेगळी पथके तयार केली. या सहा पथकांनी पहाटेच्या काळोखात एकाच वेळी या झोपडपट्टीत छापा टाकला. चार ते पाच घरांमध्ये अगदी दैनंदिन व्यवसायाप्रमाणे भरलेल्या पिशव्यांमधील दूध काढून त्यामध्ये पाणी मिसळून पुन्हा पिशव्या सीलबंद केल्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ही भेसळ करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले.
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - पोलिसांनी छापा टाकलेल्या सर्व खोल्यांमधून गोकुळ, अमूल तसेच इतर कंपन्यांच्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या, मेणबत्त्या, प्लॅस्टिकची नरसाळे तसेच भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि तब्बल एक हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सहा जणांविरुद्ध फसवणूक, अन्न सुरक्षा कायदा तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.