मुंबई - विविध शाळांमध्ये संच मान्यता आणि इतर कारणांमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन मुंबईत केले जाईल, असा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला. त्यासोबतच संच मान्यतेलाही स्थगिती देण्यात आली. त्यामुळे यापुढे अतिरिक्त ठरणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना काही दिवसांसाठी तरी दिलासा मिळणार आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयामुळे मुंबई शहराबाहेर समायोजन होणाऱ्या अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह इतर संघटनांनी स्वागत केले आहे. मुंबईत 1 हजार 35 हून अधिक अतिरिक्त ठरलेले शिक्षक आहेत. या शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी परिपत्रक काढले आहे. मुंबईच्या बाहेर ज्या शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते, त्यांचे समायोजन आता मुंबईतील शाळांमध्येच केले जाईल असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत महिनाभरापूर्वी बैठक घेतली होती. त्यात मुंबईबाहेर समायोजन होणाऱ्या शिक्षकांची व्यथा ऐकून घेत त्याविषयी तोडगा काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील शिक्षक संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरल्यास शिक्षकांना मुंबई बाहेर ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी समायोजन करण्यात आले होते. या शिक्षक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाणे- येणे त्रासदायक ठरत होते. त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या सोबत बैठक घेऊन याविषयी स्पष्ट निर्णय घेतला होता. त्यावर परिपत्रक काढण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.