मुंबई - आरेतील उर्वरित जागेत 33 मजली मेट्रो भवन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारशेड प्रमाणेच हे मेट्रो भवनही कांजूरला हलवावे, अशी मागणी आता पर्यावरणप्रेमींनी उचलून धरली आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. गरज पडल्यास न्यायालयात ही धाव घेऊ, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी घेतली आहे
आरे कारशेड कांजूरला हलवण्यात आले आहे. तसेच आरे जंगलातील 800 हेक्टर जागा वन म्हणून घोषित केली आहे. असे असले तरी आरे अजून पूर्णतः संरक्षित झालेले नाही. आरेतील उर्वरित जागेत 33 मजली मेट्रो भवन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आरे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. पण याला 'सेव्ह आरे'च्या सदस्यांनी जोरदार विरोध केला आहे.
आरेतील 20.03 हेक्टर जागेवर मेट्रोभवन-
एमएमआरडीएकडून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात 350 हून अधिक किमीच्या मेट्रो मार्गाचे जाळे विणले जात आहे. त्यानुसार येत्या 5 वर्षात अनेक मार्ग सुरू होणार आहेत. अशावेळी सर्व मेट्रो मार्गाचे व्यवस्थापन एकाच ठिकाणी व्हावे, यासाठी एमएमआरडीएने मेट्रो भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे मेट्रो भवन आरेतील युनिट 9 मधील 20.03 हेक्टर जागेवर बांधण्यात येणार आहे. या मेट्रोभवनाला आधीच सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी 33 मजली अशी मेट्रो भवनची इमारत असणार आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मेट्रो भवनच्या प्रस्तावित जागेवर एमएमआरडीएकडून सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
आरेतील मेट्रोभवनमुळे पश्चिम द्रुतगती मार्ग पाण्याखाली जाण्याची भीती-
मेट्रोभवनचे काम सुरू झाल्याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यांनी या कामाला विरोध केला आहे. सेव्ह आरे चळवळीतील प्रमुख आणि कारशेडविरोधातील याचिकाकर्त्या अमृता भट्टाचार्य यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प आरेत होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. त्या म्हणाल्या, की मुळात हा प्रकल्प आरे जंगलात उभारण्यात येत असल्याने हा आमचा विरोध आहे. तर यासाठी 100 झाडांचा बळी जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प पश्चिम द्रुतगती मार्गालगत आरेच्या जागेवर आहे. गेल्या काही वर्षांत द्रुतगती मार्गालगत पेट्रोल पंपासह काही बांधकामे केल्याने यावर्षी युनिट 9 मध्ये पावसाळ्यात पाणी साचले. हे पाणी 26 जुलैच्या मुसळधार पावसातही येथे साचले नव्हते. अशावेळी आता येथे 33 मजली इमारत उभी केल्यास युनिट 9 बरोबर पश्चिम द्रुतगती मार्ग ही पाण्याखाली जाईल. या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही या प्रकल्पाला विरोध करत असल्याचेही अमृता यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात येणार मागणी-
कांजूरला मोठ्या प्रमाणात जागा आहे. तेव्हा मेट्रो भवनही कांजूरलाच हलवावे अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही मागणी लवकरच पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महानगर आयुक्तांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एकूणच आता 'सेव्ह आरे'ने आपला मोर्चा मेट्रो भवनाकडे वळवला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अडचणी वाढून प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र आहे.