मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांना फोन करून अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी गुरजारच्या जामनगर येथून बुधवारी अटक केली होती. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
महापौरांना धमकी -
२२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांना एक फोन आला. एका अज्ञात व्यक्तीने महापौरांना फोन वर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवर बोलणारा हिंदी भाषेत बोलत होता. फोनवरून मुंबईच्या महापौरांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आहे. या धमकीच्या फोन नंतर दोन दिवसांनी महापौरांनी महापालिका मुख्यालयाला लागून असलेल्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर २६१/२०२० नोंदवला होता.
मुंबई पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून मनोज दोढी याचा शोध घेतला असून त्याला गुजरातच्या जामनगर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विलास तुपे आणि त्यांचे पथक करत आहे. मनोज दोढी या २० वर्षीय युवकाने हे कृत्य का केलं, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.