मुंबई - राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय शिक्षण विभागाने जारी केला नसला तरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मात्र आज एक नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली असली तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना आठवड्यातून 2 वेळा शाळेत हजर राहावे लागणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच उपलब्ध झाली असल्याने त्यात शिक्षकांना प्रवास करता येत नाही. यामुळे केवळ दोन दिवसच शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. त्यातही संबंधित मुख्याध्यापकांवर यासाठीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिक्षकांना शाळांमध्ये हजर राहण्याच्या नवीन नियमावलीत महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब आणि हृदयविकार आदींचे आजार असलेल्या आणि ५५ वर्षांवरील शिक्षकांना मात्र या दोन दिवस शाळेत बोलवण्यातून सवलत देण्यात आली आहे. त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत केवळ वर्क फ्रॉम होम देण्यात येणार आहे.
यादरम्यान, जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, त्यांच्यावरही ऑनलाईन शिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या शाळा क्वारंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत, त्या शाळांतील शिक्षकांना बोलवण्यात येऊ नये, असेही आज जारी केलेल्या नवीन जीआरमध्ये म्हटले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या संमतीशिवाय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्याचे आणि शिक्षकांना उपस्थित राहण्याचे कोणतेही निर्देश देवू नयेत अशी ताकीदही देण्यात आली आहे.
शाळांमध्ये पोहोचण्यासाठी कसे यायचे?
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शिक्षकांसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस शिक्षकांनी शाळांमध्ये उपस्थित कसे राहायचे? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी केला आहे. मुंबई आणि ठाण्यातील शाळांमध्ये शिक्षक हे आपल्या शाळांपासून बरेच दूरवर राहतात, त्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या अडचणींवर सरकारने तोडगा काढावा अशी मागणी घागस यांनी केली आहे.
कोरोनाच्या कामातून शिक्षकांची होणार सुटका
राज्यातील अनेक शाळेतील शिक्षकांना कोरोना आजाराच्या सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्या शिक्षकांना लवकरच या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. यासंदर्भात स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अतिरिक्त शिक्षकांच्या हाताला मिळणार काम...
मागील काही महिन्यांमध्ये राज्यातील अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये विद्यार्थी अभावी मुख्य शाळेतून अन्य आस्थापनेवर पाठविण्यात आलेल्या अतिरीक्त शिक्षकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यांना मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी, अशा सूचना यावेळी शिक्षण विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या हाताला काम मिळणार आहे.