मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत. मात्र अशाप्रकारच्या बातम्यात तथ्य नसून परमबीर सिंह यांच्या विरोधात कोणतीही लूक ऑऊट नोटीस काढली नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्याबाबत आलेल्या बातम्या या हवेतील वावड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात अकोला, नाशिक, कोपरी आदी ठिकाणी खंडणी, धमकावणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
काय आहे लूक ऑऊट प्रकरण
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास सुरू आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र या वृत्ताचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खंडन केले आहे. लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंह यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली नाही.