मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णव गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते या आधी गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता या संदर्भात अर्नब गोस्वामी यांना हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होता. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्याकडून हक्कभंग समितीला एक पत्र पाठवण्यात आले असून आज काही करणांमुळे समितीसमोर हजर राहता येणार नाही, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आता हक्कभंग समितीकडून अर्णब गोस्वामी यांना पुढील तारीख देण्यात येणार असून अद्याप ती तारीख ठरलेली नसल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपले काम व्यवस्थित करता यावे म्हणून काही विशेष अधिकार दिले जातात. काम करत असताना आमदार किंवा खासदार यांचा कोणी अपमान केला तर त्याच्या विरोधात हक्कभंग केला जाऊ शकतो.
काय आहे हे प्रकरण? -
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात वार्तांकन करताना संपादक अर्णव गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विषयी देखील अर्वाच्च भाषेत सूत्रसंचालन करत आव्हान देणारी भाषावापरली होती. त्यामुळे राज्य सरकारवर आणि राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर अर्वाच्च भाषा वापरल्याच्या कारणाने आमदार प्रताप सरनाईक यांनी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावीअशी मागणी केली होती.