मुंबई - शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत आगीची घटना समोर आली आहे. लिंक रोडवरील स्टार बाजाराजवळील अंधेरी पश्चिम भागात लेव्हल २ ची ही आग होती. दुपारी साडेचारच्या सुमारास चित्रपटाच्या सेटला ही लागल्याची माहिती आहे. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग रात्री विझवण्यात आली. मात्र या आगीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नागरी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उपनगरीय अंधेरी (पश्चिम) येथे शुक्रवारी ( 29 जुलै ) दुपारी एका चित्रपटाच्या सेटला आग लागली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या चित्रकूट ग्राऊंडवर लावलेल्या चित्रपटाच्या सेटवर संध्याकाळी 4.30 च्या सुमारास आग लागली. याआधी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आग परिसरातील एका दुकानात लागली होती. परंतु, नंतर त्यांनी पुष्टी केली की ही आग एका चित्रपटाच्या सेटवर लागली होती. घटनास्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत होते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रात्री उशिरा ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे.