मुंबई - पवईतील एका 56 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह त्याच्या घरात आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. अरूणी रविंद्र दिवानजी (56) असे या महिला डॉक्टरचे नाव असून त्या पवईतील मुक्तेश्वर आश्रम समोरील पराडाईझ-2 या इमारतीत वास्तव्यास होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अरूणी ह्या पवईतील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांना एक मुलगा असून तो लंडन येथे डॉक्टरच्या पदवीचे शिक्षण घेत आहे. 10 जुलैपासून अरूणी यांचा मुलगा लंडनवरून त्यांना फोन करत होता. पण दोन दिवस झाले आई फोन उचलत नसल्याने त्याने आपल्या मावशीला घरी जाऊन पाहायला सांगितले.
दरम्यान, डॉ. अरूणी यांची बहीण या दरवाजा उघडण्यासाठी बाहेरून आवाज देत असताना आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जेव्हा दार उघडले तेव्हा डॉ. अरूणी यांचा मृतदेह सोफ्यावर आढळला. त्यानंतर त्यांना राजावाडी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. अरूणी या पवईतल्या मोठ्या घरात एकट्याच राहत असल्याने नैराश्यातून किंवा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या शवविच्छेदन अवहालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय दळवी यांनी सांगितले.