मुंबई - कोरोनामुळे वाईट वर्ष म्हणून संबोधले जाणारे 2020 हे वर्ष काही बाबतीत थोडेसे दिलासादायकही ठरले आहे. 2020 मध्ये मुंबई लोकलच्या अपघातातील मृतांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसाठी 2020 हे वर्ष या अर्थाने थोडे दिलासाादायक असल्याचे बोलले जात आहे.
अपघातातील मृतांच्या संख्येत 65 टक्के घट
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांच्यानुसार जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान लोकल रेल्वेच्या परिसरामध्ये रेल्वे अपघातात मृत्यू किंवा जखमी होण्याच्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट आलेली आहे. 2020 मध्ये लोकल अपघातात मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 65 टक्के घट झाल्याचं समोर आलेल आहे. गेल्या वर्षभरात तब्बल 1116 प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना पडून किंवा रेल्वे रूळ ओलांडत असताना झालेल्या अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये 983 पुरुषांचा समावेश असून 133 महिलांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत 878 प्रवासीही जखमी झाले असून यामध्ये 688 पुरुष व 190 महिला प्रवाशांचा समावेश आहे.
लोकल अपघातातील मृत्यूंची ही आहे स्थिती
लोकल रेल्वेच्या मध्य मार्गावर 523 प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झाला असून तब्बल 747 प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर एकूण 369 प्रवाशांचा अपघातादरम्यान मृत्यू झाला असून 355 प्रवासी हे जखमी झाले आहेत.
1) रेल्वे रूळ ओलांडताना आतापर्यंत 730 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 129 प्रवासी हे जखमी झाले आहेत.
2) चालत्या लोकलमधून पडून 177 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 361 प्रवासी हे जखमी झालेले आहेत.
3) रेल्वे रुळांच्या बाजूला लावण्यात आलेल्या खांबांचा फटका लागून 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 प्रवासी जखमी झाले आहेत.
4) गेल्या वर्षभरात रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 7 प्रवासी जखमी झालेत. तर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 7 प्रवासी जखमी झाले आहेत.
5) धावत्या रेल्वेत खाली आत्महत्या करणाऱ्या 27 प्रवाशांचा मृत्यू झाला असून रेल्वे प्रवासादरम्यान नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या प्रवाशांची संख्याही 167 आहे.
2013 ते 2019 पर्यंत झालेल्या रेल्वे प्रवाशांचा मृत्यू
2013 या वर्षात 3506 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2014 मध्ये 3420 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 2015 मध्ये 3304 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2016 मध्ये 3202 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 2017 मध्ये 3014 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2018 मध्ये 2981 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 2019 मध्ये 2664 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.
लोकलची सध्या 90 टक्के सेवा सुरू
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेची सेवा ही 90 टक्क्यांपर्यंत सध्या सुरू आहे. कोरोना संकटाच्या अगोदर मुंबईकरांसाठी लोकल सेवा ही पूर्ण क्षमतेने चालवली जात होती. दर दिवशी जवळपास 80 लाखांहून अधिक प्रवासी हे लोकल रेल्वेचा वापर करत होते . मात्र मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट आल्यानंतर लोकल सेवा ही सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलेली होती.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिका रेल्वेवर मेहरबान; 527 कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत