कोल्हापूर : येत्या 26 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला ( Sharadiya Navratri festival 2022 ) सुरुवात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple Kolhapur ) स्वच्छतेला ( Cleaning in Ambabai Temple ) युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. आज मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे आज दिवसभर पारंपारिक येरले पद्धतीने अंबाबाईची मूर्ती झाकून ठेवण्यात आली आहे. म्हणूनच मुख्य मूर्तीचे दर्शन ही बंद असणार आहे. नेमकी काय आहे ही पारंपरिक पद्धत पाहुयात सविस्तर.
सकाळी 10 पासून स्वच्छतेला सुरुवात : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त एक आठवडा आधीपासूनच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारीची सुरुवात होते. आज बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. दरवर्षी गाभाऱ्याची स्वच्छता असते तेव्हा एक दिवस पूर्ण अंबाबाई मंदिर बंद ठेवण्यात येत असते. अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात, त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिरातीलच सरस्वती देवीच्या मंदिरा समोर अंबाबाईची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येत असते. आज सकाळपासून देवीच्या दर्शनाला आलेले सर्व भाविक येथेच उत्सव मूर्तीचे दर्शन घेत आहेत.
येरले पद्धत नेमकी काय आहे ? : गाभाऱ्यातील स्वच्छतेच्या दरम्यान अंबाबाईच्या मूळ मूर्तीला इजा पोहोचू नये यासाठी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मूर्तीला येरले पद्धतीने सुरक्षित झाकून ठेवण्यात येत असते. गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीने अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता होत आहे. मूळ मूर्तीला पूर्णपणे झाकून मूर्ती सुरक्षित ठेवली जाते. पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो त्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता आहे म्हणूनच मूर्ती झाकून ठेवली जाते.