कोल्हापूर - शेतकरी चळवळीतील आमचा असलेला अनुभव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची असलेली जाण, याची जर महाविकास आघाडीला गरज भासत असेल, तर निश्चित आम्ही जबाबदारी पासून पळ काढणार नाही. सन्मानाने जर विचारणा केली आणि काम करण्याची मोकळीक मिळणार असेल तर कृषी खात्यासारखे आव्हानात्मक खाते सुद्धा सांभाळायला तयार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजदराची दरवाढ मागे आणि थकीत वीजबील माफ व्हावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला समर्थन दिले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मंत्रिमंडळाची स्थापना केली. मात्र, अजून छोट्या पक्षांसोबत कोणत्याही पध्दतीची त्यांनी चर्चा केली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेसुद्धा याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीमध्ये रस आहे. अशा आव्हानात्मक खात्याची जबाबदारी दिल्यास नक्कीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू,असेही शेट्टी म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपूर्ण देशाने पाहिला आहे. मात्र, शेवटी सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा आता सरकारमध्ये मोठे खाते मिळेल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच राजू शेट्टींनी सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचे कृषीमंत्री पद स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे.