कोल्हापूर - मोदी सांगत असतील हमीभाव देईन, पण हमीभाव कागदावर राहून काय फायदा? व्यापाऱ्यांनी माल हमीभावाने खरेदी नाही केला तर, व्यापाऱ्यांच्यावर काय कारवाई करणार, हे पंतप्रधान मोदींनी सांगावे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
हेही वाचा - शेतकऱ्याच्या आत्महत्येतून मला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव - राज्यमंत्री बच्चू कडू
तीन कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष
पुढे शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर तीन कायदे लादले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर रोष आहे. मुंबईत निघालेल्या मोर्चात जवळपास पंधरा हजार शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकरी स्वतःहून सहभागी झाला होता. राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली असताना रात्रीच्या वेळेत घरी जायचे कसे, हा प्रश्न उभा असतानाही शेतकऱ्यांनी मुंबईतील आंदोलनाला मोठी गर्दी केली. त्यामुळेच या तीन कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये किती रोष आहे, हे कळते.
अंबानी-अदानी भांडवलाच्या बळावर भाव पाडतील
अंबानी-अदानी उद्योगात उतरणार आहेत. त्यांच्याकडे अमर्याद भांडवल आहे. भांडवलाच्या बळावर ते आणखीन भाव पाडतील, अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली. त्यांच्यावरील साठवणुकीच्या मर्यादा नवीन कायद्यामुळे उठणार आहेत. त्यामुळे हवा तेवढा साठा ते करून घेतील. शेतकऱ्यांचा माल संपल्यानंतर साठवणूक केलेल्या मालाचा भाव ते वाढवतील. त्यामुळे सामान्य माणसाला चढ्या दराने धान्य खरेदी करावे लागेल. त्याचे समर्थन करण्यासाठी तुम्ही सत्तेवर आला का? असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.
उसाची एफआरपी नाही दिली तर, साखर जप्त करून पैसे वसूल करण्याची तरतूद
उसाची एफआरपी नाही दिली तर, सरकारी खासगी किंवा सहकारी असेल तर, साखर जप्त करून ते पैसे वसूल करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. तसा कायदा भुईमूग, मका, उडीद डाळ, तूरडाळ, हरभऱ्याला हा कायदा का लागू असू नये, असे शेतकऱ्याला वाटते. मग तो माल अंबानी किंवा अदानीला खरेदी करायचा असेल, तो हमीभावाने खरेदी करू दे, असेही शेट्टी म्हणाले.
हेही वाचा - नाशिक : राज्यात 80 हजार रिक्त पदांसाठी युवकांना रोजगाराच्या संधी