कोल्हापूर - लाॅकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही वीजबिल भरणार नाही. त्यामुळे शक्तीने वीजबिल वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास किंव्हा वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्यास आता आम्हाला सुद्धा दोन हात करावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. एकीकडे वीजबिल माफीबाबत अनेक मोर्चे काढले, आंदोलनं झाली. मात्र आता शासनाने सक्तीने वसुली सुरू केली आहे. त्यामुळे स्वाभिमानीने हा इशारा दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीत वीजबिल भरणार नाही-लॉकडाऊन नंतर सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. असे असताना शासनाने वाढीव बीजबिल देऊन त्यांच्या संकटात अधिक भर टाकली. शिवाय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देऊ, असे म्हंटले होते. मात्र नंतर आलेले बिल भरावेच लागेल, असे म्हणत लोकांच्या संतापात अधिकच भर घातली. त्यामुळे आता आम्ही सुद्धा ठरवलं आहे कोणत्याही पद्धतीने वीजबिल भरणार नाही. शिवाय कोणी सक्तीने वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला दोन हात करावे लागतील, असेही शेट्टींनी म्हंटले आहे.
शरद पवारांना भेटून दिला निर्वाणीचा इशारा-
लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प असल्याने महावितरण कंपनीने सर्वच ग्राहकांचे अंदाजे रिडींग घेतले. त्यामुळे याचा मोठा भुर्दंड अनेकांना सोसावा लागला आहे. शिवाय अंदाजे घेतलेले रीडिंग आम्हा ग्राहकांच्या माथ्यावर मारले गेले आहे. आशा वेळी एखादे पॅकेज देऊन वीजबिल माफ करणे गरजेचे होते, असेही शेट्टी यांनी म्हणाले. तसेच कालच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांना भेटून याबाबत चर्चा केली असून निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला असल्याचे शेट्टी म्हणाले.
हेही वाचा- संसदेत आक्रोश उठत नाही म्हणूनच जनसंसदेतून आंदोलन करतोय - मेधा पाटकर