कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या चौघांना अटक केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींकडून ३ बंदुका, ३७ जीवंत काडतुसासह एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
रविंद्र नाईक, फारुख पटेल, बाळू सुतार, निलेश परब अशी चौघांची नावे आहेत. रवींद्र हा आजरा तालुक्यातील धनगरवाडा याठिकाणी विनापरवाना शस्त्र वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बंदुका आणि काडतुसे सापडली. पोलीस तपासात त्याच्याकडून फारुख पटेल याचे नाव समोर आले. तर या दोघांना बाळू सुतार आणि निलेश परब यांनी शस्त्र दिल्याचे समोर आले. या चौघांना अटक करून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. आरोपींना आग्र्यातून शस्त्रे मिळाल्याची माहिती समोर आल्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.