कोल्हापूर - सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णांलयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली. यड्रावकर यांनी आज सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरमधील दुर्घटना घडलेल्या कक्षाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर बैठक घेतली. विशेष म्हणजे इतकी मोठी दुर्घटना घडून सुद्धा राज्यमंत्री यड्रावकर यांनी तब्बल 72 तासानंतर रुग्णालयाला भेट दिल्याने अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
हेही वाचा - एसपी शैलेश बलकवडे यांनी स्वीकारला पदभार; म्हणाले...
यावेळी आयोजित बैठकीत राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले, की डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांनी लवकरात लवकर चांगल्या पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. शिवाय मोठा धोका सुद्धा टळला. झालेल्या दुर्घटनेचा विचार करता सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर फायर ऑडीट करुन घ्यावे, अशा सूचना सुद्धा त्यांनी बैठकीत दिल्या. ते पुढे म्हणाले, आरोग्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा द्यावी. जिल्ह्यातील बाधितांची संख्या, मुक्त झालेल्यांची संख्या, मृत्यूदर, उपचार घेत असणारे रुग्ण, रेमडेसिवीरची उपलब्धता, इतर अनुषंगिक औषधांची उपलब्धता, आरोग्य साधनांची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती सुद्धा यड्रावकर यांनी यावेळी घेतली.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा सायकलवरून फेरफटका; मास्क न घालणाऱ्यांना खडेबोल