कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत उद्या (बुधवारी) कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक येथे संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात 'मूक आंदोलन' होणार आहे. या आंदोलनात संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजातील समन्वयक येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय पार्किंगची ठिकाणेही निश्चित करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनामध्ये सर्वांनी नियमांचे पालन करावे तसेच प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा बलकवडे यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयारीबाबत माहिती देताना म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे यांनी मोर्चा न काढता केवळ मूक आंदोलनाचे आयोजन केले आहे. अनेक जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येणार असल्याबाबत चर्चा आहे. मात्र मोर्चा नसून केवळ मूक आंदोलन होणार आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. शिवाय केवळ निमंत्रकांनीच आंदोलनाला यावे, असेही त्यांनी म्हटले असून सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधिक्षकांनी केले आहे.
हेही वाचा -Maratha Reservation : कोल्हापुरात उद्या 'मूक आंदोलन'; आंदोलस्थळाची संभाजीराजेंनी केली पाहणी