सातारा : तब्बल 61 वर्षांनंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगत असून या कुस्तीचा थरार आजपासून सातारकर कुस्ती शौकीनांना अनुभवता येणार आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियमच्या संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते साडेनऊ असा दोन सत्रांमध्ये तीन गादीच्या व दोन मातीच्या अशा एकूण पाच आखाडयामध्ये या कुस्त्या रंगणार आहेत.
राज्य कुस्तीगीर परिषद व सातारा जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त सहकार्याने ही स्पर्धा साता-याच्या जिल्हा क्रीडा संकूलात होत आहे. स्पर्धेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे व सातारा जिल्हा तालीम संघाचे निमंत्रक दिपक पवार व समन्वयक सुधीर पवार यांनी दिली.
४५ संघांचा सहभाग
ललित लांडगे म्हणाले सर्व पंचांचे आगमन झाले आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व 45 संघांचे आगमन होईल. सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत तिन्ही वजनी गटातील मल्लांच्या कुस्ती स्पर्धा दोन मातीच्या तर तीन गादी आखाड्यावर होतील. पहिल्या सत्रातील कुस्ती स्पर्धा या सकाळी साडेसात ते साडेनऊ या सत्रात होणार आहेत. 900 मल्ल 110 प्रशिक्षक पंच आणि साडेपाचशे पोलीस असा सर्व लवाजमा असणार आहे.
५५० पोलिसांचा खडा पहारा
आज सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियमच्या संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत होईल. दररोज पाच दिवस विविध गटांमध्ये प्रत्येकी तीन अशा एकूण 18 कुस्त्या रंगणार असून त्यांचे प्राथमिक उपांत्य अशा दोन फेऱ्या होतील. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात तब्बल साडेपाचशे पोलिसांचा खडा पहारा असणार आहे.
हेही वाचा - Police Transfer : सात पोलिसांची तडकाफडकी बदली; मुंबई पोलीस आयुक्तांची कारवाई
61 वर्षांनंतर साताऱ्याला मान
या महाराष्ट्र केसरीच्या यजमान पदाबाबत बोलताना दीपक पवार म्हणाले, 'या स्पर्धेचे साताऱ्याला यजमान पद देण्याचे श्रेय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांचे आहे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा साताऱ्यात व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो यंदा तो मान साताऱ्याला मिळाला. तब्बल 61 वर्षांनी सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा दुर्मिळ मान मिळत आहे तालीम संघाने या स्पर्धेचे कल्पक नियोजन केले असून या संपूर्ण पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये आहे.'
९ एप्रिलला विजेता ठरणार
दिनांक 8 व 9 एप्रिल रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य व अंतिम फेरीचे 70, 92 आणि 125 किलो वजनी गटातील थरारक सामने रंगणार आहेत या सामन्यांना अधिकाधिक गर्दी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे स्टेडियमची क्षमतात 55 हजार दर्शनकांची आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरारक सामना दिनांक 9 रोजी होत असून मानाची चांदीची गदा देण्याकरिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - Summons to Salman Khan : पत्रकार मारहाणप्रकरणी अंधेरी कोर्टाचे सलमानला समन्स, सलमानची हायकोर्टात धाव