कोल्हापूर - 'लॉकडाऊन हटाव, व्यापारी बचाव' या आंदोलनाला कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवेसह इतर व्यवसायांना परवानगी द्यावी, यासाठी आज ४३ संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रतिसाद देत आज सकाळपासून कोल्हापूर लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध केला आहे. कोणत्याही परिस्थिती हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार येथील व्यापारी संघटनांनी केला आहे.
सोलापूर प्रमाणे कोल्हापूरलाही परवानगी द्या-
सकाळपासूनच कोल्हापूर लक्ष्मीपुरी बाजारपेठेतील परिस्थिती लक्षात घेता व्यापाऱ्यांनी या बंदला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. दुकाने बंद ठेवत राज्य सरकारचा निषेध केला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कोल्हापुरात देखील इतर व्यापाऱ्यांना सहा वाजेपर्यंत व्यापार करण्यास परवानगी द्यावी. या मागणीसाठी आज हे आंदोलन केले जात आहे. आज सकाळी दहा ते बारा या वेळेत व्यापारी आपापल्या दुकाना समोर उभे राहून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार आहेत.
गजबजलेल्या ठिकाणी केवळ फेरीवाले,फळभाजी विक्रेते
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते. याठिकाणी फळे भाजीविक्रेते फेरीवाले, धान्य व्यापारी असल्याने कोल्हापूर शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. दरम्यान आज व्यापाऱ्याने आंदोलन पुकारले असून सर्वच किराणा भुसारी, अडते, होलसेल विक्रेते व्यापारी यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आज लक्ष्मीपुरी बाजारपेठेत केवळ फळ भाजीविक्रेते फेरीवाले यांची उपस्थिती दिसून आले. तर इतर सर्व दुकाने बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध केला आहे.