कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने मागील 7 महिन्यांपासून अनेक उपाययोजना राबवल्या. यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या लोकांसह अस्थापनांवर दंडात्मक कारवाया करण्यात येत असून त्याद्वारे तब्बल 51 लाखांचा दंड गोळा केल्याची माहिती उपायुक्त निखिल मोरे यांनी दिली आहे. तसेच जोपर्यंत कोल्हापूर शहर कोरोनामुक्त होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहणार असल्याची तंबी त्यांनी दिलीय.
मार्च महिन्यापासून कारवाईला सुरुवात; 30 हजार नागरिकांवर कारवाई
22 मार्चपासूनच कोल्हापूर शहरात बेशिस्त नागरिकांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली. यामध्ये पालिकेच्या कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे नियम मोडणाऱ्या 30 हजारांहून अधिक नागरिक आणि आस्थापना यांच्याकडून 51 लाखांचा रुपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांसोबत अधिकारी सुद्धा रस्त्यावर
विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती, मास्क न वापरणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू ठेवली. यामध्ये कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही रस्त्यावर उतरून ही कारवाई करत होते. त्यामुळेच आता कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही कमी होताना दिसत आहे.