कोल्हापूर - नुकताच जगातील मानसिक आरोग्य दिन पार पडला. मात्र, दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. लॉकडाऊन काळात तर ही संख्या दुप्पट झाली असल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातसुद्धा अशाच पद्धतीचे चित्र असून या समस्येबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातील मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमळे यांच्याशी खास बातचीत केलीये 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...
हेही वाचा - अंबाबाईचे 'पराशरांना महाविष्णूस्वरूपात दर्शन', कोल्हापूरात बांधली पूजा
जगभरात विविध कारणांमुळे अनेकांना मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कौटुंबिक जीवनासोबतच व्यवसाय, नोकरी, अशा विविध ठिकाणी येत असलेल्या तणावामुळे अनेकांना मानसिक आरोग्य बिघडते. अशावेळी त्या रुग्णांना सर्वात महत्वाची गरज असते ती म्हणजे मानसिक आधाराची. दिवसेंदिवस अशा रुग्णांमध्ये वाढच होताना पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा अशा रुग्णांमध्ये दुप्पटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागले आहे, तर अनेकांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील 'मनोहिताय' या मानसिक केअर सेंटरमधील मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमाळे यांच्याकडे आधीच्या रुग्णांच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज विविध समस्येमुळे मानसिक तणावात गेलेले 5 ते 6 रुग्ण त्यांच्याकडे येत असतात. हीच संख्या पूर्वी निम्म्याने कमी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये प्रामुख्याने लॉकडाऊननंतर अशा समस्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
मानसिक आजार, आर्थिक असुरक्षितता आणि कामाचा ताण या पूर्वीपासून प्रचलित धोक्यामध्ये लॉकडाऊनमुळे आणखी वाढ झाली आहे. यामध्ये नियंत्रण गमावल्याची भावना, सामाजिक संबंधांमध्ये झालेली घट, नोकरीबाबत अनिश्चितता आणि सामाजिक विलगता यांची भर पडली असल्याचेही शाल्मली रानमाळे यांचे म्हणणे आहे.
अनेकांना आत्महत्या करण्याचे विचार डोक्यात आले आहेत. तर काहींनी अशा अनेक कारणांमुळे आत्महत्या केल्याचेही पाहायला मिळत आहे. रानमाळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसिक तणावाला बळी पडलेल्या व्यक्तींमध्ये महिला आणि पुरूषांचे दोघांचेही समान प्रमाण आहे. मानसिक ताण हा अतिशय गंभीर आजार असून, वेळीच याबाबत आपल्या मित्रांना किंवा संबंधित थेरपिस्टस यांना माहिती द्यावी. सतत आपल्या प्रियजनांसोबत बोलत राहणे आणि कोणतीही भीती न बाळगणे हाच या मानसिक समस्येवरचा महत्वाचा भाग असल्याचेही शाल्मली रानमाळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - अंबाबाई मंदिराचे पौराणिक महत्व आणि दरवर्षीचे पारंपरिक उत्सव; वाचा सविस्तर
ओसीडी हा लॉकडाऊननंतर प्रामुख्याने बळावलेला आजार -
मानसिकदृष्टया अस्वस्थ असलेल्या रुग्णांची चिंता कोरोनामुळे वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने ओसीडी म्हणजेच ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर हा आजार बळावला आहे. आपल्याला कोरोना किंवा इतर कोणतातरी आजार होईल या भीतीने दिवसभरात वारंवार हात धुणे, घर झाडून स्वच्छ ठेवणे असे बदल या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात. वारंवार जनजागृतीसाठी आलेले मॅसेज वाचून आणि ऐकून हे होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमाळे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.