कोल्हापूर- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूरातील बहिणीच्या घर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. कोल्हापूरातील राजरामपुरी परिसरातील मुक्ता पब्लीशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड व करवीर तालुक्यातील वाशी परिसरातील राहत्या घरी छापे टाकण्यात आले. या कारवाईत जवळपास दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरातील बहिण विजया मोहन पाटील यांच्या घर आणि कार्यालयावर गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. सकाळी 9 वाजता राजारामपुरी परिसरात असणारे मुक्ता पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिसवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने छापे टाकले. या कारवाईत चार अधिकाऱ्यांचा समावेश होता.
हेही वाचा-माझे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी - अजित पवार
अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कागदपत्रांची झाडाझडती
गुरुवारी सकाळपासूनच या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी तळ ठोकून विविध कागदपत्रांची झाडाझडती घेतली. तसेच संगणकावरील माहिती तपासण्याचे काम सुरू केले होते. यात कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कोणताही माध्यमांचा प्रतिनिधी आत येऊ नये. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांची हालचाल होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली होती.
हेही वाचा-अजित पवार यांची बहिण नीता पाटील यांच्या पुण्यातील घरी आयकर विभागाचा छापा
उशीरापर्यंत कागदपत्र तपासणीचे काम सुरू
मुक्ता पब्लिशिंग हाऊसच्या कर्मचाऱ्यांना एका बाजूला बसण्यास सांगितले होते. प्राप्तिकर विभागाचे चारही अधिकारी सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे विजया मोहन पाटील रहात असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी येथील फार्म हाऊसवर देखील जवळपास सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. सकाळी नऊ वाजता अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करून विविध कागदपत्रांची तपासणी केली. यासंदर्भात विजया पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उशीरापर्यंत कागदपत्र तपासणीचे काम सुरू होते.
हेही वाचा-हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका
राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सख्या बहिण असल्याने पवार यांचे नेहमीच याठिकाणी जाणे-येणे असायचे. प्राप्तिर विभागाने छापे टाकले याची कुणकुण कोणालाच नव्हती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना माझ्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणीच्या घरावर छापे टाकले असल्याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याचे कळताच जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवारांनी मुंबईत ही दिली प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, की माझ्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाड टाकली याचे मला काही नाही. मात्र, रक्त्याचे नाते म्हणून माझ्या बहिणींच्या घरी धाडी टाकल्या, याचे वाईट वाटते. यापूर्वी अनेक पक्षांची सरकार सत्तेत होती, परंतु, सत्तेचा इतक्या खालच्या थराला वापर कोणी केला नाही, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. सरकार येतात, जातात. आजपर्यंत सत्तेचा गैरवापर केलेला कोणी पाहिला नाही. जनता सर्वस्व आहे, ती योग्य तो निर्णय घेत असते, असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री पवार दिला.