कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुढच्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य शासनामार्फत पुढील महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. शिवाय शासकीय आरोग्य सेवेतील सर्वांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळें खासगी आरोग्य सेवेतीलसुद्धा सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन देसाई यांनी आज केले आहे.
लसीकरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कृतीदल समितीची बैठक संपन्न
कोरोना लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या पूर्व तयारीसाठी आज जिल्हा कृतीदल समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, नोडल अधिकारी डॉ. फारूख देसाई आदी उपस्थित होते. यावेळी लसीकरणासाठीच्या तयारीबाबत चर्चा झाली.
हेही वाचा - 'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका
पहिल्या टप्प्यात 5 लाख 57 हजार 176 जणांचे लसीकरण -
आजच्या कृतीदलाच्या बैठकीमध्ये नोडल अधिकारी डॉ. देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यामध्ये लाभार्थ्यांची नोंदणी, लसीकरण पथकाचे प्रशिक्षण, लसीसाठी शीतसाखळी केंद्रे याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवाय जवळपास 5 लाख 57 हजार 176 जण पहिल्या टप्प्यातील लाभार्थी असल्याची माहिती देत जिल्ह्यात एकूण 122 शीतसाखळी केंद्रे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
असा असणार लसीकरणाचा प्राधान्यक्रम -
- कोरोना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्य सेवक, कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
- दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृतीदल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि नगरपालिका, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
- तिसऱ्या गटात 50 वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा 50 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी देसाई यांचे आवाहन -
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनामार्फत कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक लस जिल्ह्यात देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्याशी निगडीत खासगी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्य सेवक यांची नोंदणी 100 टक्के पूर्ण झाली आहे. परंतु, खासगी डॉक्टर्स आणि खासगी आरोग्य यंत्रणेशी निगडीत काम करणारे जे सेवक आहेत, संस्था आहेत यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहेत. जे वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत आणि ज्यांनी वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केली आहे, अशा सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या दवाखान्यात काम करणारे सर्व आरोग्य सेवक आणि पॅरामेडीकल स्टाफ यांनी आपली नोंदणी तालुका आरोग्य अधिकारी, शहर वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त कार्यालयात नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून पुढील महिन्यात सुरू करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत आपलासुद्धा समावेश होईल, असे आवाहनसुद्धा जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.
हेही वाचा - मुकेश अंबानी बनले आजोबा; श्लोका-आकाश अंबानी यांना पुत्रप्राप्ती