कोल्हापूर - अनिल परब यांच्या विरोधातील तक्रार तयार झाली आहे. यांच्यावर प्रोऍक्टिव्हली पोलिसांकडून किंवा सरकारकडून स्वतःहून कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही वाट पाहत आहोत, तसे झाले नाही तर लवकरच आम्ही तक्रार दाखल करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. तर सुप्रिया सुळे कधीपासून युतीच्या प्रवक्त्या झाल्या? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यात बोलत होते.
- सेना भाजप युतीची शक्यता नाही :
यावेळी राज्यात पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीच्या चर्चेबाबत विचारले असता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची शक्यता नसल्याचे म्हंटले. दरम्यान, संजय राऊत हे साधे नगरसेवकसुद्धा झाले नाहीत. त्यांनी कोण शहाणे कोण वेडे हे ठरवू नये, लोकंच मतपेटीतून ठरवतील असा टोलासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.
- ही यात्रा नाही, तर येड्यांची जत्रा - संजय राऊत
राऊत यांनी भाजपची यात्रा ही यात्रा नाही, तर येड्यांची जत्रा आहे असे म्हंटले. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांचा समाचार घेतला. मराठा आरक्षणाबाबत तसेच संभाजीराजे आणि राष्ट्रपतींच्या संभाव्य भेटीबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, केंद्राने मराठा आरक्षण प्रश्नी सर्व प्रश्न सोडवले आहेत. मात्र राज्य सरकारच्या हातात आता अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे त्याची सोडवणूक राज्यानेच करणे गरजेचे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - नारायण राणेंचे मानसिक स्वास्थ्य ठीक व्हावे म्हणून शिवसैनिकांनी प्रार्थना करावी - संजय राऊत