कोल्हापूर - महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होताच अनेक इच्छुकांनी गुलालाची उधळण सुरू केली. राजारामपुरी परिसरात एका इच्छुकाने थेट मिरवणूक काढत विजयाची खूण दर्शवली. जे प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले, तेथील इच्छुकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत या सोडतीचे स्वागत केले. .
प्रभाग आरक्षण सोडत पडली पार -
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत काल पार पडली. महापालिका निवडणूक अद्याप लांब असली तरी, आत्तापासूनच गुलालाची उधळण सुरू झाली आहे. तयारी करणाऱ्या आणि आपल्या भागात अपेक्षित आरक्षण मिळालेल्या काही इच्छुकांनी आजच गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला. निवडणुकीआधी इच्छुकांनी केलेल्या या विजय उत्सवाची चांगलीच चर्चा रंगली आहे. महिला सर्वसाधारण झालेल्या प्रभागात पुरुषांच्या पदरी निराशा पडली तरी आरक्षित प्रवर्गापासून सुटका झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोडत निश्चित होताच सोशल मीडियावर संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवार चमकू लागले. महापालिकेची इमारत पाठीमागे तसेच पुढे आपली छबी झळकवून रिंगणात असल्याचे काहींनी दाखवून दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीत उमेदवारी करु इच्छिणाऱ्यांचे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेला प्रभाग आरक्षण सोडतीचा टप्पा आज पार पडला. केशवराव भोसले नाट्यगृहात आज 81 प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. 6 प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. अनुसूचित जमातीसाठी कोणताही प्रभाग आरक्षित करण्यात आलेला नाही. तो निरंक ठेवण्यात आलेला आहे.
दरम्यान, लॉटरी पद्धतीने पार पडलेल्या या आरक्षणात अनेक दिग्गजांच्या प्रभागातील आरक्षण बदलल्यानं त्यांची निराशा झालीय. अशा दिग्गजांना आता शेजारील प्रभागाचा आधार घ्यावा लागणार आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले. सर्वसाधारण म्हणजेच खुल्या वर्गातील पुरुषांसाठीसाठी 24 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने सर्वसाधारण महिला खुल्या वर्गासाठी 24 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.