कोल्हापूर - घरगुती वीज बिलांच्या माफीसाठी यापुढे जिल्ह्यातील सर्व गावे 28 नोव्हेंबर पासून बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने घेतल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि राज्य इरिगेशन फेडरेशनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 28 नोव्हेंबरपासून हातकणंगले तालुक्यातून या बंदची सुरुवात करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा - वीजबिलांबाबत 30 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्र बंदची हाक देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट लक्षात घेता दरमहा 300 युनिटच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची संपूर्ण वीज देयके माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने यापूर्वी मोर्चे, आंदोलने आणि महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. तरीदेखील वीजमाफीसंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने आता जिल्ह्यातील सर्व गावे 28 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीने घेतल्याची माहिती प्रताप होगाडे आणि राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 28 नोव्हेंबरपासून पुढील आठ दिवस हा बंद पुकारण्यात येणार असून हातकणंगले तालुक्यातून याची सुरुवात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज माफीची फाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिली आहे. तरी यावरून श्रेयवाद रंगल्याचा आरोप होगाडे यांनी केला. मात्र. तुमच्या श्रेयवादामुळे जनतेचा बळी नको, असे होगाडे या वेळी म्हणाले. याशिवाय महावितरण तोट्यात असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत सांगत असले तरी वीजबिल माफीची रक्कम राज्य सरकारने महावितरण'ला दिल्यास कोणताही तोटा महावितरणला होणार नाही. मात्र, केवळ ऊर्जामंत्री राऊत हे चालढकल करत असल्याचा आरोपही होगाडे यांनी यावेळी बोलताना केला. या वेळी, बाबासो पाटील भुयेकर, चंद्रकांत पाटील-पाडळीकर, राजेंद्र पाटील, आर. के. पाटील, मारुती पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा