कोल्हापूर - आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्टने चक्क तुळशीच्या पानावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचे चित्र साकारले आहे. अशांत मोरे असे या कलाकाराचे नाव असून हे चित्र साकारताना त्याने विशेष मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या दर्शनाला भाविक जाऊ शकत नाहीयेत. मात्र, आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना एक वेगळा आनंद देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट...
विविध लहान-लहान चित्रे साकारली
मायक्रो आर्टिस्ट अशांतने आजपर्यंत अनेक लहान चित्रं साकारली आहेत : कोल्हापुरातल्या कसबा बावडामध्ये राहणारे अशांत मोरे यांना चित्रकलेचा प्रचंड आवड आहे. त्यांनी आपली ही आवड पुढे जाऊन मायक्रो आर्टमध्ये आजमावण्यास सुरुवात केली आणि आता त्यांनी मायक्रो आर्टिस्ट म्हणून कोल्हापुरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत अशांत मोरे यांनी विविध लहान-लहान चित्रे साकारली आहेत. विठुरायचीसुद्धा अनेक चित्र त्यांनी साकारली आहेत. मात्र यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त चक्क तुळशीच्या पानावरच विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. आपल्या बोटांच्या नखांवर बसेल इतक्या छोट्या आकाराचे हे तुळशीचे पान असून डोळ्यात साठवून ठेवावे, असे हुबेहूब चित्र त्यांनी साकारले आहे.
हेही वाचा - आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाला ‘वारी नाही रे’ गात भावनिक साद!
मायक्रो पेंटिंगसाठी विशेष ब्रश
अशा पद्धतीची चित्र साकारायला खूप कष्ट आणि मेहनत लागते. आकाराने लहान असल्याने खूपच संयमाने आणि काळजी घेऊन अशी चित्रे सकारावी लागतात. त्यासाठी ब्रशसुद्धा तशाच पद्धतीचे वापरावे लागतात. त्यासाठी अशांत मोरे यांनी तसा ब्रश बनवून घेतला. त्यांनी स्वतः सुद्धा घरामध्ये काही ब्रश बनवले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका तांदळावर चित्र साकारले होते. त्यासाठी त्यांनी केसांचा वापर करून एक ब्रश बनवला होता. दरम्यान, यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त तुळशीच्या पानावरच साकारलेल्या विठ्ठलाच्या चित्राची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.