ठाणे - कल्याणच्या तिसगाव परिसरात खाकी वर्दीला धक्का पोहोचविणारी घटना घडली आहे. नाकाबंदी दरम्यान तपासणी करणाऱ्या पोलिसाने एका तरुणाचे काठीने डोके फोडल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. विनाकारण मारहाण करणाऱ्या त्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे. निलेश कदम असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कोळसेवाडी पोलिसांची दबंगगिरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कल्याण पूर्वेकडील चक्की नाका परिसरात राहणारे निलेश कदम अंक आणि भुपेंद्र झुगरे हे दोघे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने उल्हासनगरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोळसेवाडी पोलिसांची तपासणी मोहीम सुरू होती. निलेश व भुपेंद्र हे तेथून जात असताना एका पोलिसाने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले. त्यामुळे निलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलिसांचा बोलण्यास नकार ..
या घटनेची नोंद करण्यासाठी निलेश आमणि त्याचा मित्र पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची नोंद करून घेण्यास नकार दिला. तसेच त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही करतो, पण विषय वाढवू नका, असे पोलिसांनी सांगितल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कोळसेवाडी पोलिसांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्यांतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. पत्नीसह दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या?
हेही वाचा - सख्या आईची हत्या करून फरारी झालेला आरोपी तीन वर्षानंतर गजाआड