औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादमध्ये बोलताना विविध मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा प्रश्न आहे. त्यावर भाजपने आंदोलन केले तर आम्हीही त्यात सहभाग नोंदवू असे राऊत म्हणाले. तर मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेवरूनही त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
निवडणूक आयोग दिल्लीच्या आदेशावर चालत आहे
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत विधानसभा निवडणुका घेण्यावरूनही राऊत यांनी भाजपवर टीका केली. काही राज्यांमध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाला या गोष्टी कळायला हव्या. निवडणूक आयोग दिल्लीतल्या राज्यकर्त्यांचा आदेशावर चालत आहे. पश्चिम बंगालच्या बाबतीत ते हा आदेश जास्तच पाळत आहेत. देशात कोरोनाविरोधात युद्ध लढण्याची गरज आहे. मात्र भाजपने ममता दीदींविरोधात युद्ध सुरू केले आहे अशी टीकाही राऊत यांनी केली.
लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार
मी औरंगाबादला आहे, इथे कुठे मला आंदोलन दिसले नाही. लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलनाचा अधिकार आहे. कुणीही आंदोलन करावं. त्याला सरकारने विरोध करण्याचं काहीही कारण नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. देशात अनेक प्रश्न आहेत. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. त्यावर भाजपने आंदोलन केलं तर आम्हीही त्यात सहभागी होऊ असे राऊत म्हणाले.
राज ठाकरेंना टोला
शिवसेनेचा जन्म मराठीच्या मुद्द्यावर झाला आहे. शिवसेना आजही यावर काम करत आहे. आता कुणी स्वाक्षरी घेत असेल, कुणी काय करत असेल. पण याची प्रेरणा ही शिवसेनेनेच दिली आहे अशा शब्दांत राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंनाही टोला लगावला.
मुख्यमंत्री हे मिस्टर सत्यवादी
पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मुख्यमंत्री त्यावर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री हे न्यायप्रिय आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. ते नेहमी सत्याची कास धरतात असे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
भाजपकडूनच मोदींच्या भूमिकेला छेद
विरोधी पक्षानं विधानसभेचं अधिवेशन चालू देणार नाही ही भूमिका घेतली आहे. त्यांची ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेला छेद देणारी आहे. सर्व सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे अशी मोदींची भूमिका आहे. मात्र त्याला राज्यात भाजपकडूनच विरोध केला जात आहे असा टोला राऊत यांनी लगावला. महाराष्ट्रात मजबूत विरोधी पक्ष आहे. त्यांनी आपली ताकद दाखविली पाहिजे. मात्र ती संसदीय लोकशाही मार्गाने दाखविली पाहिजे असे आम्हाला वाटते असेही राऊत यावेळी म्हणाले.
अशा गोष्टींचा निषेधच
विरोधी पक्षानं त्यांची भूमिका ठरविली आहे. त्यांची भूमिका विधायक कामांसाठी हवी होती. राज्यासाठी हवी होती. एखाद्या चूकीच्या गोष्टीवर बोट ठेवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा नक्कीच अवलंब केला पाहिजे. मात्र एखाद्याचं सार्वजनिक जीवन उद्धवस्त करण्यासाठी कुणी राजकारण करत असेल तर त्याचा आम्ही कायमच निषेध करू असे राऊत म्हणाले. तर सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांवर आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संजय राऊत डिमोरलाईज होत नाही असेही ते यावेळी म्हणाले.