औरंगाबाद - शहरातील भारतनगर भागात शनिवारी रात्री दोन तरुण तलवार घेवून फिरत होते. अशा प्रकारे शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाला पोलिसांनी जेरबंद केले. तर त्याचा एक साथीदार अंधारात पसार झाला. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल ज्ञानेश्वर दाभाडे (वय २२, रा.नवनाथ मंदिराजवळ भारतनगर),असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार गणेश तनपुरे हा घटनास्थळाहून पसार झाला आहे.
तलवार जप्त, गुन्हा दाखल
दोघेही गारखेडा परिसरात असलेल्या भारत नगर येथे हातात तलवार घेऊन फिरत हिते. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. याबाबत पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत राहुल दाभाडे याला ताब्यात घेतले. यावेळी अंधाराचा फायदा घेत गणेश तनपुरे हा पसारा झाला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातील तलवार जप्त केली असून दोघांविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.